महालक्ष्मी मंदिर
 
 

भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मादिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्त्या आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापार्‍याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला.

मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी बी. ए. देसाई मार्गावर हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.

महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत.

मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे. इंग्रजांनी महालक्ष्मी भाग वरळी क्षेत्राची योजना आखली होती. त्यासाठी ब्रीच कॅंडी मार्ग बनविण्यात येणार होता. पण समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत होते. त्यावेळी देवीने एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा आदेश दिला. रामजीने तसेच केले आणि त्यानंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला.

मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.